श्रीकृपा न्यास
फुले जणु अद्वैताचे फूल
भगवान श्रीरामकृष्ण
फुले जणु अद्वैताचे फूल || धृ ||
कोमल तनु ही तपे वाळली
अविचल भावे शान्त बैसली
भावावेगे कधी डोलली
कधी न देखाव्याची झूल || १ ||
नयनांमाजी अखंड करुणा
एके भावी असे धारणा
कधी वृत्ति न उठे दारुणा
असे मनि समरसतेचा डोल || २ ||
दया दाटली अंत: करणी
वेदांताची नसे दाटणी
मंजुळ शब्दें नटली वाणी
मनामधि श्रवणें रुतती बोल || ३ ||
संगे माता असे सारदा
तीहि फुलाच्या घेई छंदा
ऐक्य पावली ती सुखकंदा
तयां ना तनुभोगाची भूल || ४ ||
विवेक संगे जो आनंद
तया संगती जमले वृन्द
ज्ञानें प्रेमें झाले धुंद
पश्चिम प्राची झाले पूल || ५ ||
