श्रीकृपा न्यास
देव आणि जीवन
जीवन दोन घडीचा खेळ
तिथे हो दु:खा कैचा वेळ || धृ ||
सृष्टी सुंदर केली देवे
सुख दु:खे ती मिळती देवे
स्वर्ग हा, कशा करावा माळ || १ ||
कर्तव्याच्या अढळ आसनी
देवाजवळी प्रेमे बसुनी
वाजवी समरसतेचे टाळ || २ ||
सुख तैसे दु:खाचे कारण
देव जाहला स्वयेचि आपण
कशातें कोणी पिटावे भाळ || ३ ||
देवचि झाला आपण रोगी
जंतु जाहला रोगालागी
औषधा माजी त्याचे बळ || ४ ||
देव सज्जनी, दुष्ट दुर्जनी
पातकी तसा आणि पावनी
कुणाचा घ्यावा त्यावरी आळ || ५ ||
भव्य वैभवी तोची विराजे
दीन दरिद्री राहे सहजे
आळसा, यत्नाचे तो फळ || ६ ||
जन्मे तोची आणि तो निमे
न कळे जीवा म्हणुनिया भ्रमे
सार्थकी लावी अपुला काळ || ७ ||
