श्रीकृपा न्यास
गावी आनंदाची गाणी
जीवन आळवावरचे पाणी
सदाचि गावी जीवनात या, आनंदाची गाणी || धृ ||
कर्म करावे जे देवा आवडे
ते न करावे जे जीवा नावाडे
अहं अहंचे सदा असो वावडे
दैन्य आणि दारिद्र्य पाहता डोळा यावे पाणी || १ ||
देव सदा साठवी तू अंतरी
तोचि पाही बाहेरी जगभरी
नाम तयाचे घेऊ दे वैखरी
त्या तालावर जीवन जगणे, असो नसो की कोणी || २ ||
मनी धरी श्रीगुरूंचे सांगणे
ध्यानी सोSहं वरीच आरूढणे
भेदावाचून जग सारे पाहणे
त्या दृष्टीची सदा असावी अंत:करणी धणी || ३ ||
आता देही फिरून नाही जाणे
कोण म्हणे तो आम्हां येणे जाणे
तो सत्याचे रहस्य कांही नेणे
सती असे ते सहज, बोलते संतांची ती वाणी || ४ ||
